** जिल्हा क्रीडा संकुल येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन **
लातूर, दि. १९ (जिमाका): जागतिक योगा दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व विविध योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, गणेश पवार, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, ज्ञानेश्वर काकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांच्यासह पतंजली योग समिती, योगासन भारत समिती, प्रजापिता ब्रह्मकुमारी आदी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जागतिक योगा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे सुमारे पाच हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
जागतिक स्तरावर २१ जून हा दिवस योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये यादिवशी योगा शिबिरे आयोजित करावीत. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची मदत घेवून नागरिकांमध्ये योगा विषयक जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी श्रीमती करमरकर यांनी केले. २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता जागतिक योगा दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
शासकीय कार्यालये, शाळा, स्वयंसेवी संस्थांनी पोर्टलवर नोंदणी करावी
जागतिक योगा दिनानिमित्त केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी योगा शिबिरे, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्यासाठी https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. २१ जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास इच्छुक संस्थांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर या पोर्टलवर २१ रोजी योगा कार्यक्रमाची छायाचित्रे अपलोड करावीत. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमाणपत्र (Certificate of Appreciation) संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था यांना प्राप्त होणार आहे.






















