लातूर/ प्रतिनिधी :प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर शहर महानगरपालिका यांच्या समन्वयाने मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत टीबी रुग्णांना न्यूट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप करण्यात आले.
शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून या कीट वाटप करण्यात आल्या.विजय पस्तापुरे, प्रसाद उदगीरकर, शाम धूत,रामेश्वर सोमानी, दीपक वारद, राजू मिनियार, नरेंद्र भुतडा, संजीव भार्गव, रतन बिदादा यांच्या सहकार्यातून हे किट देण्यात आले.
यावेळी बोलताना आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहरात राबविण्यात येणारा फूड बास्केट देण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. मनपाच्या आरोग्य विभागाने या कामी राखलेल्या समन्वयाबद्दल कौतुक करतानाच टीबी रुग्णांना वर्षभरासाठीचे न्यूट्रिशनल किट पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या वतीने औषधींचा मोफत पुरवठा करण्यात येतो.रुग्ण पूर्णपणे बरा होण्यासाठी औषधासोबतच पोषण आहार आवश्यक असतो. त्याच्या पूर्ततेसाठी लोक सहभागातून न्यूट्रिशनल सपोर्ट किट देऊन निक्षय मित्र होता येते.निक्षय मित्र होण्याची प्रेरणा घेऊन डॉ. अशोक पोद्दार यांनी आपल्या मित्रमंडळींना याकामी योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांनी केले. डॉ.ऋषिकेश खरोळकर यांनी सूत्रसंचलन केले.
या कार्यक्रमास मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका आणि क्षयरोग विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






















